
हद्दपार असलेला आरोपी सम्राट कॉलनीत सापडला; बेकायदेशीर शस्त्रसह एमआयडीसी पोलिसांची कारवाई
हद्दपार असलेला आरोपी सम्राट कॉलनीत सापडला; बेकायदेशीर शस्त्रसह एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव, दि. २८ जुलै (प्रतिनिधी)
शहरातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २५, रा. तुकारामवाडी) याला बेकायदेशीर शस्त्रासह सम्राट कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी ही तीव्र आणि अचूक कारवाई करत त्याच्या ताब्यातून लोखंडी चॉपर जप्त केला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील पो.कॉ. योगेश घुगे, पो.उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेका. गणेश शिरसाळे, पो.हे.कॉ. संदीप सपकाळे आणि पो.ना. विकास सातदिवे यांना कारवाईचे निर्देश दिले.
सम्राट कॉलनीत झडप घालून अटक
आज, सोमवार, २८ जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सम्राट कॉलनी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. जोशी टेन्ट हाऊसजवळील गल्लीमध्ये पवन बाविस्कर उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पो.कॉ. योगेश घुगे आणि पो.ना. विकास सातदिवे यांनी पाठलाग करून त्याला दुपारी १.३० वाजता ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता तो हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले. त्याने जळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे कबूल केले. पंचनामा करताना त्याच्या अंगझडतीत १०० रुपये किमतीचा लोखंडी चॉपर आढळून आला.
कायदेशीर कारवाईचा बडगा
या प्रकरणी आरोपीविरोधात हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तातडीच्या आणि निर्भीड कारवाईमुळे एमआयडीसी पोलिसांच्या कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन बाविस्कर याच्यावर यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची नोंद असून, त्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम