
हुमणी अळीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हुमणी अळीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलढाणा, प्रतिनिधी
पावसाच्या हुलकावणीमुळे पिके धोक्यात असतानाच आता सोयाबीन या पिकावर हुमणी अळीचा प्रादृर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. सोयाबीन हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून याच पिकावर हुमणे अळीने आक्रमण केले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन या अळीमुळे धोक्यात आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उगवून आलेले सोयाबीन पिक संकटात सापडले आहे त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सरकारने नुसकानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून सोयाबीन हेच प्रमुख पीक आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परंतु हुमणी अळीच्या आक्रमणामुळे सध्या सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हुमणी कीड हि बहुभक्षी असून तिच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने पिवळी पडत आहे.तर काही शेतात मोठ्या प्रमाणात झाडे सुकताना दिसत आहे. झाडे उपटून तपसल्यास त्यांची मुळे कुरतडलेली दिसतात. तसेच झाडाच्या मुळांजवळ २-३ इंच खोलीवर अळ्या आढळून येत असल्याने प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांनी अगोदरच विविध बँकांचे कर्ज घेऊन पेरणी केली आहे.त्यात उशिरा आलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट आणि आता पिकांवर विविध रोगासह हुमणी अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन पिक पूर्णपुणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शेतकऱ्याचा यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटने चे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांमध्ये पिसला जात असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देऊन आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत सहानुभूती दाखवून त्यांना तातडीने मदत करावी अशी आग्रही मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम