
१६ वर्षांपूर्वीच्या फॅक्टरी आगीप्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास
१६ वर्षांपूर्वीच्या फॅक्टरी आगीप्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास
अमळनेर सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) : पारोळा येथे १६ वर्षांपूर्वी घडलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरी आगीप्रकरणी जबाबदार ठरलेल्या तिघा मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या आगीत तब्बल २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
१० एप्रिल २००९ रोजी पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत लागलेल्या भीषण आगीत स्फोटक पदार्थांमुळे मोठा स्फोट झाला. यात स्त्री-पुरुष कामगारांसह बालकामगारांचा समावेश असलेल्या २१ जणांचा मृत्यू झाला तर ३९ जण गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर पारोळा पोलिसांनी भादंवि कलम ३०४(२), ३३७, ३३८, २१२ आणि स्फोटक पदार्थ कायदा १८८४ तसेच बालकामगार कायदा १९८६ अंतर्गत फॅक्टरी मालक व इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
तपासात असे निष्पन्न झाले की, आगीच्या काही दिवस आधीच फॅक्टरीचा परवाना कालबाह्य झाला होता. कामगारांना आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले नव्हते तसेच फॅक्टरीत नियमबाह्य बालकामगार काम करत होते. याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले, मात्र त्यापैकी ३८ साक्षीदार फितूर झाले होते.
तथापि, न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ. योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके आणि तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांच्या साक्षीवर विश्वास ठेवत, आरोपी गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे व मनीषा चंद्रकांत शिरोळे यांना दोषी ठरवले.
न्यायालयाने त्यांना भादंवि कलम ३०४(२) अंतर्गत दहा वर्षांची सक्तमजुरी आणि स्फोटक पदार्थ कायदा कलम ९(ब) अंतर्गत दोन वर्षांची सक्तमजुरी तसेच प्रत्येकी १० हजार व २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही शिक्षा एकत्र भोगायची आहे, असे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, सहा अन्य आरोपींपैकी एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला अॅड. मयूर अफूवाले आणि नंतर अॅड. राजेंद्र चौधरी यांनी बाजू मांडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम