
१ लाखाच्या बदल्यात ५ लाख देण्याचे आमिष; ७ भामट्यांना ग्रामस्थांचा चोप
१ लाखाच्या बदल्यात ५ लाख देण्याचे आमिष; ७ भामट्यांना ग्रामस्थांचा चोप
बोदवड (प्रतिनिधी) – यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवून “१ लाख द्या… त्याच्या बदल्यात ५ लाख मिळतील” असे आमिष दाखवत ७ जणांनी एका व्यक्तीकडून १ लाख रुपये हिसकावून फसवणुकीचा प्रयत्न केला. मात्र, ही शक्कल ओळखताच गावकरी संतापले आणि ७ पैकी ४ जणांना पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. बोदवड तालुक्यातील नांदगाव येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
नांदगावच्या पोलिस पाटील प्रियंका भंगाळे यांनी सकाळी ८ वाजता पोलिसांना माहिती दिली की गावात चार संशयितांना स्थानिकांनी पकडून मारहाण केली आहे. माहिती मिळताच हवालदार अय्यूब तडवी व पथकाने घटनास्थळी धाव घेत चारही जणांना ताब्यात घेतले. जमावाने केलेल्या मारहाणीत ते सर्व जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी बोदवड ग्रामीण रुग्णालयात, तर त्यापैकी दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
फिर्यादी संजयकुमार प्रेमचंद पिपलोदिया (४४, रा. सुसनेर, म.प्र.) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता नांदगाव उड्डाणपुलाजवळील निर्जन ठिकाणी आरोपींनी त्यांना बोलावले. तिथे १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देऊ, असे सांगत त्यांनी “बच्चो का बैंक” अशी लिहिलेली खेळण्यातील नकली नोटांची बंडले देण्याचा प्रयत्न केला.
हे लक्षात येताच फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्र गिरीराज पवार यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने १ लाख रुपये हिसकावले.याप्रकरणी सय्यद साबीर, अंकल अशोक पारधी, करम किरण बोदडे, प्रज्ञात समाधान पाटील, सैय्यद मेरिफ, नीलेश पुरळ, विकी गुरचळ अशा सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत वेगवेगळ्या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९, बीके १५२९) जप्त केली आहे. तपास उपनिरीक्षक गजानन रहाटे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम