
२० लाखांचा गांजासाठा जप्त; एकजण अटकेत
२० लाखांचा गांजासाठा जप्त; एकजण अटकेत
चोपडा पोलिसांची कारवाई
चोपडा | प्रतिनिधी –
चोपडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात मोटारसायकलवरून गांजा वाहतूक करणाऱ्या एका इसमाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचा गांजासाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.
गोपनीय माहितीनुसार, चोपडा तालुक्यातून एक व्यक्ती मोटारसायकलीवर गांजा घेऊन येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयिताला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे १० किलो ६०० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला.
पोलिसांनी कालूसिंग गोराशा बारेला (वय २६, रा. महादेव, ता. शिरपूर, जि. धुळे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून प्रतिबंधित गांजा, वापरलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकात सपोनि एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ आणि महेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अटक केलेल्या आरोपीकडे गांजाचा साठा कुठून आणला गेला आणि कुणासाठी होता, याचा तपास सुरू असून, या प्रकरणात अजून काहीजणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम