
२५ फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्याने एकाचा मृत्यू ; एक गंभीर
२५ फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्याने एकाचा मृत्यू ; एक गंभीर
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या २५ फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
भोकरबारी येथून पारोळ्याकडे दुचाकीने जात असलेले अशोक एकनाथ कोष्टी (वय ७०, रा. पारोळा) हे भोकरबारी धरणाजवळील सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात पडले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच रोहित राजेंद्र सुतार (वय ३०, रा. कासोदा) हेदेखील त्याच खड्ड्यात दुचाकीसह पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक आशितोष शेलार यांनी जखमींना तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अशोक कोष्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पारोळा पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणताही दिशाफलक किंवा सूचना फलक लावण्यात आला नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, धरण परिसरात काम करताना सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम