
२५ लाखांच्या खंडणीची मागणी; अमळनेरात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
२५ लाखांच्या खंडणीची मागणी; अमळनेरात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
अमळनेर (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) याच्याविरुद्ध बीएनएस कायदा कलम ३०८ (२) व ३०८ (३) अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक खलाणे हे चाळीसगाव येथील महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ या संस्थेत सचिव पदावर कार्यरत असून संस्थेअंतर्गत १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये चालविली जातात. संस्थेच्या अखत्यारीतील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १५ शिक्षकांवर गैरवर्तनप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करत सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले होते. या कारवाईचा राग मनात धरून संबंधित शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल करत संस्थेवर प्रशासक नेमण्याचा आदेश मिळविला होता. मात्र या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती.
दरम्यान, न्यायप्रविष्ट प्रकरणे सुरू असतानाच आरोपी अनंत निकम याने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी फेसबुकवरील ‘अनंत निकम’ या प्रोफाईलवरून संस्थेबाबत खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ९ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीने साक्षीदारामार्फत फिर्यादी यांना अमळनेर येथे बोलावून एकूण २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास खोटे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच खोट्या, गंभीर गुन्ह्यांत अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
खंडणीची रक्कम कमी करण्यासाठी मध्यस्थ नगराज चिंतामण वाघ यांच्यामार्फत संपर्क साधल्यानंतरही आरोपीने ४ ते ५ लाख रुपये देण्याची धमकी दिल्याने अखेर फिर्यादी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनंत रमेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम