
३ जानेवारीला केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर होणार
३ जानेवारीला केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर होणार
जळगाव : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली असून ही यादी आता दि. ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतरित्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. यापूर्वी दि. २७ डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निर्देश प्राप्त झाल्याने मतदार यादी जाहीर करण्याची तारीख बदलण्यात आली आहे.
दरम्यान, दि. २७ डिसेंबर रोजी दुबार मतदारांची यादी तपासण्यासाठी कंट्रोल चार्ट अपलोड करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
महानगरपालिका निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर ते दि. ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे.
दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम पार पडणार असून त्याच दिवशी अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल, तर दि. १९ जानेवारी रोजी शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम