५३ लाखांच्या विम्यासाठी शालकाचा खून

बातमी शेअर करा...

५३ लाखांच्या विम्यासाठी शालकाचा खून

पारोळ्यात धक्कादायक प्रकार उघड

प्रतिनिधी | पारोळा
पारोळा तालुक्यातील एका कापूस व्यापाऱ्याने सख्या शालकाच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या विमा पॉलिसी घेतल्या आणि त्या रकमेवर डोळा ठेवून त्याचा खून करत अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सूक्ष्म तपासामुळे अवघ्या दहा दिवसांत या कटाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही घटना १७ एप्रिलच्या रात्री घडली. शेवगे (ता. पारोळा) येथील संदीप भालचंद्र पाटील याने आपल्या शालक समाधान शिवाजी पाटील (रा. फागणे, जि. धुळे) यांच्या नावे एलआयसीच्या तीन आणि खासगी कंपन्यांच्या दोन, अशा एकूण पाच विमा पॉलिसी घेतल्या होत्या. अपंगत्व आणि व्यसनाधीनतेचा फायदा घेत संदीपने समाधान पाटील यांच्या पत्नीस वारसदार घोषित करून ही रचना आखली होती.

हल्ला करून अपघाताचा बनाव

१७ एप्रिलच्या रात्री संदीप आणि त्याचा आतेभाऊ चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी समाधान पाटील यांना स्कुटीवरून धुळे-पारोळा महामार्गावर नेले. तिथे अंधाराचा फायदा घेत लोखंडी रॉडने डोक्यावर घाव घालून त्यांचा खून केला आणि नंतर अपघाताचा बनाव केला.

पोलिसांचा सखोल तपास

रात्री १०.३० वाजता संदीपने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. मात्र घटनास्थळी मृतदेहाजवळ रक्ताचे डाग दूरवर आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. संदीपच्या परस्परविरोधी जबाबांमुळे तसेच त्याच्या मोबाईलच्या सीडीआर तपासणी व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी खुनाचा कट उघडकीस आणला. विशेष म्हणजे स्कुटी पूर्णपणे सुस्थितीत असल्याने अपघाताचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.

दोघांना अटक; गुन्ह्याची कबुली

भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संदीप व चंद्रदीप या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा खुलासा डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत केला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम