
६४ कोटींच्या एमडी ड्रग्जप्रकरणात मुख्य आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
६४ कोटींच्या एमडी ड्रग्जप्रकरणात मुख्य आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
चाळीसगाव : धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात जुलैमध्ये उघडकीस आलेल्या तब्बल ६४ कोटी रुपयांच्या एमडी क्रूज प्रकरणातील मुख्य आरोपी महालिंगम नटराजन याचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगलय यांनी अर्ज क्रमांक ८३०/२०२५ वर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला. दरम्यान, २४ जुलैला रात्री गस्ती दरम्यान कन्नड घाटात संशयित कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल ६४ कोटी रुपयांचे एमडी क्रूज आढळले होते. चौकशीत कार चालकाने हा मुद्देमाल आरोपी महालिंगम नटराजन यांच्या निर्देशानुसार वाहतूक केल्याचे कबूल केले.
त्यानुसार महालिंगम, त्याचा मुलगा योगेश तसेच चालक या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी योगेश महालिंगम अद्यापफरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, महालिंगम नटराजन याला २८ जुलैला अटक करून सुरुवातीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. जामीन अर्जावर सुनावणी घेताना न्यायालयाने मुद्देमालाची अत्यंत मोठी रक्कम, एमडी हा तरुण पिढीसाठी घातक, समाजविघातक पदार्थ गुन्ह्याची व्यापकता व गंभीरता या सर्व बाबी लक्षात घेऊन जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अभियोजक पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. तपास पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम