ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

बातमी शेअर करा...

ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मालेगाव (प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून गावकऱ्यांपासून राज्यभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात संशयित विजय खैरनार यास पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून निरपराध बालिकेचे प्रथम अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून निर्दयपणे जीव घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या क्रूर कृत्याचा उलगडा झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप अनावर झाला असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाचा जलद निकाल लागावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी जारी झालेल्या आदेशानुसार हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेनंतर विविध ठिकाणी निषेध मोर्चे, रास्ता रोको, उपोषण, मेणबत्ती मार्च असे आंदोलनांचा भडिमार सुरू आहे. घटनेच्या तिसऱ्याच दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी डोंगराळे येथील ग्रामस्थांसह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खटला जलदगतीने चालवण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना वेगाने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम