उत्तराखंडात दरड कोसळून 10 जण बेपत्ता !
बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ देशात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या बेसुमार पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान होवू लागले आहे तर उत्तराखंडच्या रुद्र प्रयागमध्ये मुसळधार पावसानंतर डोंगरावरची दरड कोसळली. गौरी कुंडाजवळ ही घटना घडली. ही दरड टेकडीवरून घसरून दुकानांवर पडली. वृत्तानुसार, ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती आहे. 10 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
गौरी कुंड परिसरात गुरुवारी रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे. भूस्खलनानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत, खराब हवामानामुळे अडचणी येत आहेत. दुसरीकडे, हिमाचलमध्ये या पावसाळ्यात आतापर्यंत 199 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 बेपत्ता आहेत. 199 मृत्यूंपैकी 57 मृत्यू भूस्खलन आणि पुरामुळे झाले, तर 142 लोकांचा पावसाळ्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव म्हणाले की, या पावसाळ्यात हिमाचलला खूप नुकसान झाले आहे. आतापर्यंत 6563.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यात 774 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 7317 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 254 दुकाने आणि 2337 गोशाळांचेही नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, राज्यात 79 भूस्खलनाच्या घटना घडल्या. राज्यात सुमारे 300 रस्ते बंद आहेत. 274 वीज आणि 42 पाणीपुरवठा योजना अजूनही ठप्प आहेत. पुढील दोन दिवसांत भारतीय हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी अलर्ट जारी केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम