
हॉटेलमध्ये पुण्यातील वृद्धाचा मृतदेह आढळला
हॉटेलमध्ये पुण्यातील वृद्धाचा मृतदेह आढळला
शहरातील नवीन बस स्थानकाजवळील घटना
जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बस स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये पुण्याहून कामानिमित्त आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आहे. ते रबरी शिक्के बनवण्याचे काम करीत होते, तर त्यांचा मुलगा वकिली व्यवसायात आहे. मोहम्मद शफी हे दि. २८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात रबरी शिक्के देण्यासाठी आले होते. काम पूर्ण केल्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या बेपत्ताबाबतची तक्रार जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी सकाळी नवीन बस स्थानकाशेजारील एका हॉटेलमधील खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह अत्यवस्थ व कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला असून, तेथे ओळख पटल्यावर मुलाने हंबरडा फोडला. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेचा तपास जिल्हापेठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, मृत्यूमागील नेमकी पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम