
पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू
अमळनेर तालुक्यातील निम येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निम येथील तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. सोमवारी (२ जून) सकाळी ही घटना घडली असून, सायंकाळी उशिरा एका मुलाचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर उर्फ हरीश बाळू पाटील (वय १२) आणि चेतन धनराज पवार (वय ९, दोघेही रा. निम, ता. अमळनेर) हे दोघेजण सकाळी १० वाजेच्या सुमारास तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मारवाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जिभाऊ पाटील, हेकॉ. संजय पाटील, आगवणे आणि फिरोज बागवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. चेतनला पोहता येत नसल्याने तो नदीत बुडाला होता. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला.
दुसरा मुलगा मयूर उर्फ हरीश पाटील याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. या दुर्दैवी घटनेमुळे निम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम