
वावडे शिवारात सामाईक विहिरीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
वावडे शिवारात सामाईक विहिरीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील वावडे शिवारात सामाईक विहिरीतून पाणी भरण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर काठ्या आणि लोखंडी रॉडने झालेल्या बेदम मारहाणीत झाले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, सहा नातलगांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, ७ जून रोजी सकाळी १० वाजता घडली असून, फिर्याद सोमवारी, ९ जून रोजी दाखल करण्यात आली.
नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०, रा. वावडे, ता. अमळनेर) हे शेतकरी असून, त्यांचे व त्यांच्या काकांचे वावडे शिवारातील गट नंबर ४२२ मधील शेतात सामाईक विहीर आहे. या विहिरीतून आळीपाळीने पाणी भरण्याचे ठरले असताना, शनिवारी सकाळी नरेंद्र पाणी भरण्यास गेला असता, त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटारीचा फ्यूज काढून घेतला. याबाबत नरेंद्रने जाब विचारला असता, रागाच्या भरात शिवाजी पाटील, काकू सुलाबाई पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई आणि पुतण्या प्रतीक पाटील यांनी नरेंद्रला शिवीगाळ करत लाकडी काठी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत नरेंद्रला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी सहा संशयितांविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम