
ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ६ जुलैपर्यंत मुदतवाढ
ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ६ जुलैपर्यंत मुदतवाढ
जळगाव, प्रतिनिधी– उन्हाळी हंगाम २०२४–२५ करिता शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल अॅपद्वारे करावयाच्या नोंदणीसाठी राज्य शासनाने ७ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता सहायक स्तरावरून पीक नोंदणी करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत भौगोलिक व तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना नोंदणीस अडथळे निर्माण झाले होते. हे लक्षात घेऊन शासनाच्या निर्णयानुसार ही मुदतवाढ देण्यात आली असून, मा. जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्यामार्फत यास मान्यता देण्यात आली आहे.
‘ई-पीक पाहणी’ नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे शेतकऱ्यांना अचूक पीकदाखला, पीकविमा योजना, अनुदान, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळविण्यास मदत होते.
शेतकरी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनच पीक नोंदणी करू शकतात. या अॅपचा वापर सुलभ असून, आपल्या शेती व पीकविषयक माहितीची अचूक नोंद शासनाच्या प्रणालीत करता येते.
शासनाच्या विविध योजना व संरक्षणासाठी ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी ही संधी वापरून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम