
दर्जेदार वीजसेवा, थकबाकी वसुली आणि वीजहानी नियंत्रणाला प्राधान्य द्यावे – महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे निर्देश
दर्जेदार वीजसेवा, थकबाकी वसुली आणि वीजहानी नियंत्रणाला प्राधान्य द्यावे – महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे निर्देश
जळगाव – कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज वितरणाच्या गुणवत्तेसह ग्राहकसेवेवर भर देण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी विविध परिमंडळातील योजनांचा आणि कामांचा सविस्तर आढावा घेतला.
ते म्हणाले की, नवीन वीजजोडणीसह चालू ग्राहकांना दर्जेदार, सुरळीत सेवा देणे ही प्राथमिकता आहे. सेवा मानकांनुसार ठरवलेल्या कालावधीतच सेवा देण्यावर भर दिला जावा. वारंवार वीजपुरवठा खंडित होणारे भाग तातडीने ओळखून तेथे उपाययोजना करण्यात याव्यात. पायाभूत यंत्रणेसाठी स्थानिक आराखड्याच्या आधारे कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गेल्या काही महिन्यांत थकबाकीत वाढ झाल्याने आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी वीजबिल वसुली शंभर टक्के होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूलवाढ व वसुली बाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत त्यांनी वीजचोरी थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले.
या बैठकीला कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंते इब्राहिम मुलाणी (जळगाव), सुंदर लटपटे (नाशिक), चंद्रमणी मिश्रा (कल्याण) आणि संजय पाटील (भांडूप) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांशीही श्री. चंद्र यांनी संवाद साधला. महाराष्ट्रात वीज दरात कपात झाल्यामुळे औद्योगिक ग्राहकांना मोठा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लघु आणि उच्चदाब औद्योगिक दरात पुढील पाच वर्षांमध्ये हळूहळू घट होत जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप, आरडीएसएस योजना, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आदी योजनांसंदर्भातही त्यांनी कंत्राटदार एजन्सीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम