
द्रौपदी नगरात दिवसाढवळ्या चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
द्रौपदी नगरात दिवसाढवळ्या चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
जळगाव: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, आता द्रौपदी नगरातील एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दिवसाढवळ्या घर फोडून चोरट्यांनी तब्बल २ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना १५ ऑगस्टच्या पहाटे उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
द्रौपदी नगरातील रहिवासी सुभाष सीताराम पाटील (वय ६८) हे १४ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या कुटुंबासह घराबाहेर गेले होते. त्यांच्या बंद घराची रेकी करून चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू घेऊन ते पसार झाले.
चोरीची घटना लक्षात येताच सुभाष पाटील यांनी तात्काळ जिल्हा पेठ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत. शहरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या या चोरट्यांच्या टोळीचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे. नागरिकांनी घराबाहेर जाताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम