
“स्वप्न पाहा, मेहनत करा आणि भविष्य घडवा – आजचा दिवस युवांचा आहे” — ॲड. अर्जुन पाटील
बोदवड प्रतिनिधी :– बोदवड विधी सेवा प्राधिकरण व बोदवड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिवस तसेच विविध कायदेविषयक जागरूकता कार्यशाळेचे आयोजन बोदवड महाविद्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी १२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे महत्त्व, ध्येय, धोरणे तसेच युवांच्या कर्तव्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तरुणांपुढील आव्हाने, लोकांसाठी शासनाच्या विविध योजना, तसेच न्यायालयामार्फत विधी सेवा प्राधिकरणामार्फत युवकांसाठी करण्यात येणारे प्रयत्न या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे महत्त्व :
या दिवसाचे खरे महत्त्व म्हणजे तरुणाईला आपल्या जबाबदाऱ्या जाणवून देणे, सामाजिक बदलासाठी त्यांचा उत्साह व सामर्थ्य योग्य मार्गाने वळविणे, कौशल्य विकासाद्वारे त्यांना सक्षम करणे व राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे होय.
यावेळी बोलताना वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२५ चा थीम अधोरेखित केला. भारत सरकारतर्फे युवकांच्या प्रगतीसाठी, विशेषतः स्किल डेव्हलपमेंट व स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे सांगितले की “तरुण देश उभारण्याचे मोठे कार्य करू शकतात आणि त्यांच्या हातातच भारताचे भविष्य आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश ए. पी. खोलम यांनी पीसीपीएनडीटी अधिनियम कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.ॲड. धनराज प्रजापती यांनी हुंडाबळी व महिलांचा छळ, ॲड. के. एस. इंगळे यांनी जातीयवाद या विषयावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल, सचिव विकास कोटेजा, ॲड. किशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.या वेळी प्रा. नितेश सावदेकर, अजित पाटील, शरद पाटील, तुषार सोनवणे, विशाल जोशी, कमलाकर कापसे, धीरेन्द्रकुमार यादव, डॉ. रत्ना जवरास, डॉ. गीता पाटील, प्रा. कंचन दमाडे, डॉ. भाग्यश्री चौधरी, प्रा. पूजा अग्रवाल, प्रा. उज्वला सुरवाडे, स्वरूपा नागरिक, अतुल पाटील यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गीता पाटील यांनी केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम