अकरावीच्या प्रवेशाचा गोंधळ; ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा!’ म्हणत गुलाबराव वाघ यांची सरकारवर टीका

बातमी शेअर करा...

अकरावीच्या प्रवेशाचा गोंधळ; ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा!’ म्हणत गुलाबराव वाघ यांची सरकारवर टीका

 

जळगाव: अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया संपून सहा फेऱ्या पार पडल्या असल्या तरी, मोठ्या संख्येने विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी केला आहे. ‘एकीकडे पक्ष प्रवेशांसाठी धावपळ सुरू आहे आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे,’ अशी टीका करत त्यांनी ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा!’ अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

धरणगावातही तीच परिस्थिती

वाघ यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. विशेषतः धरणगाव येथील ज्युनिअर कॉलेजमध्येही अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू आहे. गुण असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या

या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक राठोड (नाशिक), शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम, सहाय्यक शिक्षणाधिकारी इजाज शेख आणि प्रशासकीय अधिकारी प्रतिभा सुर्वे यांची भेट घेतली. यावेळी गुलाबराव वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. ‘मागणाऱ्याला शिक्षण देऊ’ असे म्हणणाऱ्या सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वाघ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मार्ग काढण्याचे आवाहन केले. जर शिक्षण विभाग आणि शासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यातून निर्माण होणाऱ्या परिणामास जिल्हा परिषद आणि सरकार जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेनेचे विराज कावडिया, पीयूष गांधी, निलेश चौधरी, विशाल वाणी, प्रमोद घगे, गुलाब कांबळे, योगेश चौधरी, योगेश पाटील, सचिन चौधरी, दीपक बडगुजर, किरण ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम