विद्यार्थ्यांच्या घडविण्यात आई – वडिलांबरोबरच शिक्षकांचे योगदान अनमोल – गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

विद्यार्थ्यांच्या घडविण्यात आई – वडिलांबरोबरच शिक्षकांचे योगदान अनमोल – गुलाबराव पाटील

७५० शिक्षकांचा झाला सन्मान 

 जळगाव प्रतिनिधी,: “विद्यार्थ्यांच्या घडविण्यात आई – वडिलांबरोबरच शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. शिक्षक म्हणजे समाजाचा आत्मा असून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे आशीर्वाद असतात, म्हणून मला शिक्षकांविषयी खूप अभिमान आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवणे हे आजचे महत्त्वाचे आव्हान आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनी सांगितले की, जगातला सर्वश्रेष्ठ अनुभव हा गुरुचा अनुभव असतो. त्याच्याच मार्गदर्शनातून आपण घडत गेलो, कधी चुकलो, पुन्हा घडत गेलो. आज काळ बदलला असला तरी जिद्दीचे आणि विद्यार्थ्यांवर जीव ओवाळणारे शिक्षकच महाराष्ट्र घडवू शकतात. शिक्षकांनी अराजकीय राहून फक्त विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे प्रेरणादायी विचार प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात विठ्ठल कांगणे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.

पाळधी येथील सु. गो. की. लोन येथे आयोजित जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील शिक्षक सन्मान सोहळ्यात पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांनी उपस्थित शिक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांनी शिक्षकांचे समाजातील स्थान, योगदान आणि जबाबदाऱ्या यावर हृदयस्पर्शी विचार मांडून अडीच तास हसविले. कार्यक्रमाचे आयोजन भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन, जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील व जीपीएस ग्रुपचे अध्यक्ष विक्रम पाटील व त्यांच्या टीम यांनी सूक्ष्म नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने केले होते.

भावनिक आणि मिश्किल शैलीत पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “मी दहावीनंतर डी.एड. केले असते तर आज ‘गुलाब गुरुजी’ म्हणून रिटायर झालो असतो,” एवढं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी जुन्या काळातील शिक्षकांचा उल्लेख करत म्हटले, “पूर्वीचे शिक्षक कठोर होते, पण त्या कठोरतेत माया होती. त्यांनी समाजात मूल्यसंस्कार रुजवले. आजचे शिक्षकही त्या परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत.”

कांगणे सर पुढे म्हणाले, “शिक्षकांच्या संघटित कृती, अंत:करणातून केलेले कार्य आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमच समाजाला पुढे नेऊ शकते. पूर्वीचे शिक्षक ओरडायचे, रागवायचे, कधी शिक्षा द्यायचे, पण त्या रागातही प्रेम असायचं. त्या मास्तरांनी दिलेली शिकवण आयुष्यभर साथ देते. देशातील प्रत्येक मोठा नेता, अधिकारी किंवा मंत्री हा कोणाच्या तरी शिक्षकाचा विद्यार्थी असतो, हे विसरता कामा नये.”

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, शिक्षकांचे समाजात अनन्यसाधारण असे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या घडणीत शिक्षक हे खऱ्या अर्थाने आधारवड असतात. प्रत्येक शिक्षकाने आपल्या कार्यातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा, त्यांच्या जीवनाला दिशा द्यावी आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारे विद्यार्थी घडवावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सु. गो. की. लोन येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील सुमारे ७५० शिक्षकांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील, व्याख्याते विठ्ठल कांगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमाला ऊर्जामय वातावरण लाभले.

यांची होती उपस्थिती
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सैंदाणे, जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, धरणगाव गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, जळगाव गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, ग्रा.पं. अध्यक्ष अजबसिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील व डी.ओ. पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, सचिन पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र सपकाळे, व्ही.जी.एन.टी. चे अध्यक्ष राजू पाटील, डॉ. कमलाकर पाटील, जितू पाटील, संदीप सुरडकर, प्राचार्य अजिंक्य जोशी तसेच जळगाव व धरणगाव तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जि. प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी शिक्षक सन्मान सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली. बहारदार सूत्रसंचालन प्राचार्य नरेंद्र मांडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक भूषण पाटील सर यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम