
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’ आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’ आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार
मेंदू विकार, मेडीसीन तज्ज्ञांच्या टीमचे यश
जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. वेळेवर केलेल्या योग्य निदान व न्युरोलॉजी, मेडिसिन तसेच क्रिटिकल केअर टीमच्या समन्वयामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. याबाबत माहिती अशी की, रजनी जावळे (वय ६२ रा. नशिराबाद) या महिलेला मागील काही दिवसांपासून सतत मळमळ, उलट्या, बडबड आणि भान हरपणे या तक्रारींनी त्रस्त होती. रुग्णालयात दाखल होताच प्राथमिक तपासणीत तिच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत वाढलेले आढळले. काही वेळातच तिच्या एका हाताला आणि पायाला झटका आला व शरीराच्या एका बाजूचा हालचाल करण्याचा ताबा सुटला. त्यामुळे तिला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी रजनी जावळे या महिला रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. हितेश मोरे यांनी तातडीने एमआरआयद्वारे मेंदू तपासणी केली असता मेंदूतील काही भागांना योग्य रक्तपुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीला मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी असे म्हणतात. हा आजार मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो आणि रुग्णाची चेतना व स्मरणशक्ती बिघडवतो. रक्तातील साखर, इलेक्ट्रोलाईट्स, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या कार्यातील बिघाडामुळे मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. अनुभवी न्युरोलॉजीस्ट व मेडिसिन विभागाच्या टीमने सतत लक्ष ठेवून औषधोपचार, मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आणि औषधोपचाराद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणले. त्याचबरोबर इलेक्ट्रोलाईट संतुलन राखत मेंदूच्या सूज कमी करण्यासाठी औषधे दिली गेली. काही दिवसांच्या सातत्यपूर्ण उपचारानंतर रुग्णाचे भान परत आले आणि हात-पायांची हालचाल हळूहळू सुधारली. सध्या ती पूर्ण शुद्धीवर असून स्वतः बोलू व चालू शकते. या यशस्वी उपचारासाठी वरीष्ठ मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रया कांते, डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. तेजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्युरोलॉजीस्ट डॉ. हितेश मोरे, डॉ. आशिक शेख, डॉ. हर्ष पटेल, डॉ. ललितकुमार, डॉ. रिषभ पाटील, डॉ. राजसुरज लोखंडे, डॉ. ऋषीकेश वझे, डॉ. तन्मय मेहता, डॉ. सई पाटील, नर्सिंग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कोट… रुग्ण भरती झाला तेव्हा अनियंत्रीत होता. रक्तातील घटक कमी झाले होते. योग्य उपचार मिळाल्याने पक्षाघातावर नियंत्रण मिळविता आले. गोल्डन अवर्स अर्थात साडेचार तासाच्या आत पक्षाघाताच्या रुग्णावर उपचार झाल्यास कायमस्वरूपी येणार अपंगत्व टाळता येते. – हितेश मोरे, वरीष्ठ निवासी मेंदू विकार तज्ज्ञ

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम