
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
आठ लाखांची रोकड जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव – एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत तब्बल आठ लाखांची रोकड जप्त केली. भरदिवसा एका ज्येष्ठ नागरिकाची बॅग लांबवून पळ काढणाऱ्या दोघांना जेरबंद करत पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवले.
घटनेची माहिती अशी की, विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी) हे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी मोठी रोकड घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग हिसकावून घेतली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ८४१/२०२५ अन्वये BNS कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सततच्या अनुशोधनाद्वारे पथकाने दिनांक २३ नोव्हेंबर रोजी संशयितांचा माग काढला आणि दोन आरोपींना अटक केली.
विजय शांताराम पाटील (४१, रा. कलावसंत नगर)
जितेंद्र छोटुलाल जाधव (४४, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड) या दोघांना अटक करण्यात आली.
दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत फिर्यादीकडील आठ लाखांची रोकड काढून दिली. पोलिसांनी ती रक्कम जशीच्या तशी हस्तगत केली असून पुढील तपासासाठी आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पीएसआय शरद बागल, सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे आदींचा समावेश होता.
तसेच तांत्रिक मदतीसाठी ‘नेत्रम’ येथील पोकों पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास आणि ‘सायबर सेल’ येथील पोकों गौरव पाटील व मिलींद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम