
मुक्ताईनगर येथे भाजपा प्रचार कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
मुक्ताईनगर येथे भाजपा प्रचार कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
मुक्ताईनगर – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचार मोहिमेला अधिकृत सुरुवात केली आहे. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले आणि शहरातील राजकीय तापमान आणखी चढले.
उद्घाटनापूर्वी खासदार रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे आणि भाजप नेते अशोक कांडेलकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विभागीय निवडणूक प्रमुख नंदू भाऊ महाजन, डॉ. केतकीताई पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना महाजन आणि माजी नगराध्यक्ष नजमा तडवी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “शिवसेनेकडून नऊ जागांसाठी युतीचा प्रस्ताव आला होता. मात्र स्थानिक पातळीवरील आमची ताकद, परिस्थिती आणि मतदारांचा कल पाहता, स्वबळावर निवडणूक लढवणे आम्हाला योग्य वाटले.”
त्यांनी स्पष्ट केले की, खासदार रक्षाताई खडसे यांनाही मुक्ताईनगरमध्ये भाजपा सहज विजय मिळवू शकते, असा ठाम विश्वास असल्यानेच पक्षाने युतीचा प्रस्ताव नाकारला.
या स्पष्टीकरणामुळे मुक्ताईनगरमधील युती राजकारणावर पडदा पडला असून, भाजपा नगराध्यक्षपदासह सर्व जागांसाठी आक्रमकपणे मैदानात उतरल्याचे आजच्या उद्घाटन सोहळ्यातून स्पष्ट झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम