
एस.डी. सीडतर्फे विद्यार्थ्यांसाठी ए.आय. मार्गदर्शन शिबिर
एस.डी. सीडतर्फे विद्यार्थ्यांसाठी ए.आय. मार्गदर्शन शिबिर
इयत्ता दहावीच्या ११५ विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी वाढत्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत बनवून भविष्यातील करिअरसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरेशदादा जैन शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एस.डी. सीड) यांच्या वतीने गुरुवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत इयत्ता दहावीच्या सुमारे ११५ विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावर भव्य व सविस्तर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व उत्साही प्रतिसाद लाभला.
सध्या शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, बँकिंग, शेती तसेच दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाची योग्य ओळख करून घेणे अत्यावश्यक असल्याच्या जाणिवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत एस.डी. सीडच्या उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिर अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले.
यानंतर एस.डी. सीड गव्हर्निंग बोर्डचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्रास्ताविकातून आजच्या स्पर्धात्मक व डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील करिअर संधी, नवे व्यवसाय आणि शिक्षणपद्धतीत होणारे बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा सकारात्मक व जबाबदार वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. डी. कोळी सर यांनी केले.
मार्गदर्शन सत्रात पुणे येथील नामवंत आयटी तज्ज्ञ श्री. संजीव चौधरी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्राथमिक ते सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत दिली. ए.आय. म्हणजे काय, संगणक कसा विचार करतो, मशीन लर्निंग व डेटाची भूमिका काय आहे, तसेच दैनंदिन जीवनातील ए.आय.चा वापर त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला. अभ्यासात ChatGPT सारखी ए.आय. साधने कशी उपयुक्त ठरू शकतात, माहिती संकलन, उत्तरांची रूपरेषा आणि विचारशक्ती कशी विकसित करता येते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रियांका चौधरी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील ए.आय.चा प्रभाव स्पष्ट केला. ChatGPT, Google Gemini यांसारख्या ए.आय. टूल्सच्या मदतीने अभ्यासाचे नियोजन, नोट्स तयार करणे, कठीण विषय समजून घेणे व परीक्षेची तयारी कशी करता येते, हे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले. तसेच सायबर सुरक्षिततेचे महत्त्व, चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आणि ए.आय.चा सुरक्षित व जबाबदार वापर यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्याख्यानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या शंका विचारल्या.
कार्यक्रमास एस.डी. सीड गव्हर्निंग बोर्डचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मुख्याध्यापक श्री. एस. पी. निकम, गव्हर्निंग बोर्डचे ज्येष्ठ सदस्य श्री. निळकंठराव गायकवाड, श्री. महेश गोरडे तसेच मार्गदर्शन समिती सदस्य श्री. विवेक काटदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिर यशस्वी होण्यासाठी एस.डी. सीडचे प्रतिनिधी व भगीरथ शाळेच्या शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना भविष्यातील ए.आय. आधारित जगासाठी सज्ज करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विवेक काटदरे यांनी आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम