दै. बातमीदार । ३ जून २०२३ । राज्यात गेल्या काही दिवसाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगर येथे जाहीर सभेत सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करू सिंधी समजाचा अपमान करत भावना दुखावल्याच्या निषेधार्थ भारतीय सिंधू सभेच्या नगर शाखेच्या वतीने तोफखाना पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे आता आ.आव्हाड चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे.
भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष दामोदर बठेजा यांच्या नेतृत्वाखाली शिस्टमंडळाने तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्याकडे तक्रार दिली. यावेळी शहराध्यक्ष रमेश कुकरेजा, उपाध्यक्ष मोती अहुजा, सचिव जितेश सचदेव, सहसचिव सागर बठेजा, खजिनदार राहुल बजाज आदींसह मोठ्या संख्यने सिंधी नागरिक उपस्थित होते. यावेळी भगवान झुलेलाल महाराजांचा जयजयकार करत आमदार आव्हाड यांच्याही निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
२७ मे रोजी उल्हासनगर येथे जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना ”१०० सिंधी कुत्रे देखील माझे काहीही बिघडवू शकत नाही”, असे बेताल वक्तव्य केले. आव्हाडांच्या या बेताल वक्तव्याने सर्व सिंधी समाजात संताप पसरला असून समजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा संपूर्ण सिंधी समाजाचा अपमान आहे. असा अपमान सिंधी समाज कधीही सहन करणार नाही. बेजबाबदार वक्त्यव्य करणाऱ्या विकृत मनोवृत्ती असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करू गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम