बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३
ब्रेनडेड झालेल्या ५ दिवसांच्या अर्भकाच्या अवयवदानामुळे ३ चिमुकल्यांना जीवदान मिळाल्याची घटना गुजरातच्या सुरत शहरात घडली. ब्रेनडेड अर्भकाचे दोन मूत्रपिंड व यकृत दान करण्यास त्याचे पालक तयार झाले. त्यामुळे हे अवयव तीन गरजू बालकांना देण्यात आल्याने या तिघांचा जीव वाचू शकला, अशी माहिती गुरुवारी ऑर्गन डोनेशन संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली.
अमरेली जिल्ह्यातील हिरे व्यापारी हर्ष संघानी यांच्या पत्नीची सुरतच्या एका खासगी रुग्णालयात १३ ऑक्टोबर रोजी प्रसूती झाली. मात्र, जन्मलेले बाळ कोणतीही हालचाल करत नसल्याचे कळल्याने या दाम्पत्याचा अपत्यप्राप्तीचा आनंद क्षणभंगूर ठरला. त्यांनी बाळाला तत्काळ अधिक उपचारासाठी सुरत शहरातील दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी चिमुकल्याला ब्रेनडेड घोषित केल्याचे जीवनदीप ऑर्गन डोनेशन फाऊंडेशनचे ( जेओडीएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त विपुल तलाविया यांनी सांगितले. ब्रेनडेड बाळाची माहिती मिळाल्यानंतर तलाविया व सरकारी न्यू सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. नीलेश कछाडिया यांनी संघानी दाम्पत्यास त्यांच्या बाळाचे अवयवदान करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या विनंतीला मान देत संघानी यांनी अवयव दानासाठी सहमती दिली. मातापित्याकडून सहमती मिळाल्यानंतर पी. पी. सवानी रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी बाळाच्या शरीरातील दोन मूत्रपिंड, कॉर्निया, यकृत व प्लीहा काढण्यात आला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम