
तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड ; अंधारेंचा मंत्र्यांना इशारा !
दै. बातमीदार । १ जून २०२३ । राज्यातील शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जशासतसं उत्तर दिलं आहे. तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येत असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
परभणी येथे बोलतांना तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. सुषमा अंधारे यांचा पूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे. आमच्या रणरागिनी शांत आहेत. त्या ज्यावेळी मैदानात उतरतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं सावंत म्हणाले होते.
यासह तानाजी सावंत यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाकडे भाडेतत्वावर दिलं आहे. त्यावरही सुषमा अंधारे भडकल्या. त्यावर बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्यही नव्हते . माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. सावंत हे नाकाने वांगे सोलत आहेत. राहुल नार्वेकर, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण पावस्कर, प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादीचं पार्सल आहेत की परग्रहावरुन आले आहेत, याचं उद्या सामंतांनी उत्तर द्यावं, असं अंधारे म्हणाल्या. ‘हा फक्त ट्रेलर आहे. मी तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येणार आहे.’ असा इशारा सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांना दिला. त्या गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम