जिल्हा दूध संघात भ्रष्ट कारभारावर चाप आणणार-आ.अनिल पाटील… दूध संघात विजयाबद्दल मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार…
अमळनेर(आबिद शेख)जळगाव जिल्हा दूध संघात अमळनेर तालुका मतदार संघातून मोठा विजय मिळाल्याने अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सर्व सन्माननीय मतदार आणि विजयासाठी परिश्रम घेणारे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले,महाविकास आघाडीतील आम्ही पाचही संचालक आगामी पाच वर्षे संघाच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेऊन भ्रष्ट कारभारावर चाप आणणार असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
दूध संघात प्रथमच संचालक म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सर्व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला,यावेळी आमदारांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांशी संवाद साधला,यावेळी बोलताना ते म्हणाले की जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो,आम्हाला समाधानकारक मते देणाऱ्या मतदार बंधू आणि भगिनींचे यांचे आभार मानतो,प्रत्यक्षात माझा विजय झाला असला तरी आमच्या अपेक्षित जागा थोड्या फरकाने गेल्याने त्याचे दुःख आहेत,परंतु जिल्ह्यात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचाच हा विजय आहे,आमचा दूध उत्पादक जगला पाहिजे हेच धोरण ठेवून आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो होतो ,मात्र गडगंज श्रीमंत असलेले राज्यातील दोन विद्यमान मंत्री व चार विद्यमान आमदार यांनी निवडणुकीत मोठा आर्थिक व्यवहार केल्याने त्यांच्या पॅनलचा विजय झाला,शेतकरी बांधवांच्या संस्थेत सहकार सारख्या क्षेत्रात हे प्रकार अतिशय धोकादायक व निंदनीय आहे,आमचे प्रमुख उमेदवार परभुत झाले असले तरी आधी बिनविरोध झालेले माजी आमदार दिलीप वाघ व आता निवडलेलो आम्ही चार असे पाचही संचालक अभ्यासू असल्याने येणाऱ्या काळात सर्व कामकाजावर आम्ही बारकाईने लक्ष देऊ,दूध उत्पादक जगला पाहीजे त्याला न्याय मिळाला पाहिजे हेच धोरण आमचे कायम राहील आमच्या भूमिकेवर आम्ही ठामच राहू,या निवडणुकीत विरोधी पॅनल मध्ये जे जे उमेदवार विजयी झालेत त्यांचे अभिनंदन आणि आमच्या शुभेच्छा देखील आहेत,मात्र पारदर्शक कारभार करा हाच आमचा आग्रह आहे.खरतर मायक्रो प्लॅनिंगची ही निवडणूक होती,यात ज्याचे प्लॅनिंग चांगले तो उमेदवार विजयी झाला आहे,आमचे बहुतांश उमेदवार थोड्या थोड्या फरकाने पराभूत झाले असल्याने मतदारांनी पॅनलला नाकारलेले नाही हे देखील स्पष्ट आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की सुरवातीला निवडणूक बिनविरोध आम्ही सकारात्मकच होतो,त्यावेळी पक्षाने आदेश दिले असते तर माघार देखील घेतली असती मात्र तसे न घडता निवडणूक लागल्याने आणि विरोधी पॅनल कडून दोन विद्यमान मंत्री आणि चार आमदार मैदानात उतरल्याने राष्ट्रवादीचा एकमेव आमदार म्हणून निवडणूक लढविणे माझी जवाबदारी होती ती मी स्वीकारली आणि मतदारांच्या आशीर्वादाने विजयी झालो असा खुलासा आमदार अनिल पाटील यांनी शेवटी केला.यावेळी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील,माजी सभापती भोजमल पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान या निवडणुकीच्या विजयानंतर आमदार अनिल पाटील यांनी सहकार क्षेत्रात आपले असलेले वजन,अभ्यास आणि दबदबा सिद्ध केला असून याचा परिणाम आगामी अमळनेर तालुक्यातील निवडणूकीवर निश्चिंतपणे दिसणार असा अंदाज राजकीत वर्तुळात व्यक्त होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम