अभिनेत्री प्राजक्ता झाली कोटी रुपयाच्या फार्म हाऊसची मालकीण !
दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ । गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयातून राज्यातील मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजविणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिने क्षेत्रासह तिने व्यावसायिक क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. मागील वर्षी तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. त्यानंतर आता प्राजक्ताने तिचं नवं फार्म हाऊस खरेदी केले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे प्राजक्ताने या फार्महाऊसला एक खास नाव दिले आहे.
निसर्गाच्या सानिध्यात खरेदी केलेल्या फॉर्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असे आहे. हे नाव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या जुन्या निवासस्थानाशी मिळतेजुळते आहे. प्राजक्ताची ही प्रॉपर्टी करोडो रुपयांची आहे. फार्महाऊस खरेदी करण्यासाठी तिनं कर्ज काढले आहे. मात्र प्राजक्ताच्या प्राजक्तकुंजचा राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या घराच्या नावाशी काही संबंध आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राजक्तानं नव्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. “स्वप्न साकार. माझ्या स्वप्नातील फार्महाऊसची हक्काची मालकीण. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत. फेडू, फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.” दरम्यान , मागील काही दिवसांपासून बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी नवं घर, फार्महाऊस खरेदी करत आहेत. यातच आता प्राजक्ताने देखील नवं फार्महाऊस खरेदी केल्याने ती चर्चेत आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम