आदित्य बैठकीपूर्वी तुरुंगाच्या बाहेर नसतील ; नितेश राणे !
दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ । देशातील २६ विरोधक एकवटले असून आता मुंबईतील बैठकीपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे तुरुंगाच्या बाहेर नसतील, असा इशारा भाजप आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी ठाकरेंना दिला.
केंद्रातील सत्ताधारी भाजपशी दोनहात करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांच्या 26 पक्षांनी I.N.D.I.A. नामक आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबईला विकण्याचे काम केले. मुंबईच्या भ्रष्टाचाराचा खरा मालक कोण असेल, तर ती उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ठाकरेंची मुंबईत किती ताकद उरली हे मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीत कळेल. त्यांच्या तुकडे – तुकडे गँगची मुंबईत बैठक होईल, तोपर्यंत उद्धवजींचा मुलगा जेलच्या बाहेर राहणार का हा मुख्य प्रश्न आहे, असे नीतेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी विरोधकांची बैठक मुंबईत घेण्याचे धाडस करू नये, असा इशाराही नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरेंना दिला. उद्धव ठाकरेंनी विरोधकांची बैठक मुंबईत घेण्याचे धाडस करू नये. कारण, तोपर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया फार टोकाला पोहोचल्या असतील. कदाचित विरोधकांचे स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे तुरुंगाच्या बाहेरही नसतील, असे राणे म्हणाले. नीतेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वीही ठाकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरा देवीची माफी मागावी असे वक्तव्य केले. पोहरा देवीची माफी कुणी मागावी याचे उत्तर 4 डिसेंबर 2019 च्या जीआरमध्ये आहे. त्यांनी जो जीआर काढला त्यामध्ये पोहरा देवी यात्रेसाठी 25 कोटींची जी तरतूद केली होती त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोहरा देवीची आणि समाजाची माफी कुणी मागावी? याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम