देशमुखांच्या सुटकेनंतर राऊतांनी घेतली भेट ; सरकारवर केला हल्लाबोल !
दै. बातमीदार । ३० डिसेंबर २०२२ । महाविकास आघाडी मधील मंत्री असलेले अनिल देशमुख हे नुकतेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आज प्रथमच भेट घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर ते आर्थर जेलमधून बाहेर आले आहेत. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागल. देशमुख बाहेर आल्यानंतर पक्षात आनंदाचे वातावरण आहे.यावेळी राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले की, अनिल देशमुख ३० वर्षांपासून सार्वजिक जीवनात आहे. त्यांची संपूर्ण कारकिर्द ही निष्कलंक आहे, हे सर्वांना माहित आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, दिल्लीतील नेते, झारखंडमधील काही नेते असतील यांच्याबाबत कायद्याचा गैरवापर करण्यात आला. शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही जिंकलो.
राऊत पुढं म्हणाले की, कायदा हा दहशतवाद वाढविण्यास मदत करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी आहे. आमच्यासारखे राष्ट्रभक्त तुम्हाला दहशतवादी वाटत असेल तर संविधानातील अनेक व्याख्या बदलाव्या लागतील. अनिल देशमुख ज्या संकटातून गेले त्या संकटातून मीही गेलेलो आहे. त्यामुळे मी त्यांना खास भेटण्यासाठी आलो.आमच्यावर जे प्रसंग आले ते प्रसंग शत्रुवरही येऊ नये. अडीच वर्ष महाराष्ट्रातील सत्ता आमच्याही हातात होती. युपीएच्या काळातही सत्ता जवळून पाहिली. पण शत्रुसोबत आम्ही निर्घुणपणे वागलो नव्हतो, असंही राऊत म्हणाले. न्यायव्यवस्थेत अजुनही रामशास्त्री आहेत, ज्यांच्यामुळे न्यायदेवतेवर विश्वास ठेवता येतो, असंही राऊत यांनी नमूद केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम