
एयर इंडिया ने पुन्हा केली चूक; प्रवाशांची मोठी गैरसोय
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मंगळवारी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळी साडेसातच्या सुमारास उड्डाण अपेक्षित असलेल्या विमानाने तब्बल पाच तास उशिराने दुपारी साडेबारा वाजता उड्डाण केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला विलंब झाला असला, तरी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
एअर इंडियाचे (एआय २४७०) हे विमान पुणे-दिल्ली दरम्यान सकाळी ७.४० वाजता उड्डाण करणार होते. त्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणे दोन ते अडीच तास आधीच विमानतळावर दाखल झाले होते. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना वेळेत विमानात बसविण्यात आले. मात्र, नियोजित वेळ उलटूनही विमानाने उड्डाण न केल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. सुमारे एक तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवण्यात आले. उड्डाणास होणाऱ्या विलंबाबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी वारंवार चौकशी सुरू केली. अखेर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानात येऊन तांत्रिक कारणांमुळे उड्डाणाला विलंब होत असल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत.
दुपारी साडेबारा वाजता उड्डाण
ज्या प्रवाशांच्या दिल्लीहून पुढील कनेक्टिंग फ्लाइट्स होत्या, त्यांना पर्यायी विमानांचा पर्याय देण्यात आला. मात्र, थेट दिल्लीला जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. यामध्ये सरकारी अधिकारी, व्यावसायिक, नोकरदार तसेच काही वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश होता. अखेर दुपारी साडेबारा वाजता विमानाने पुण्याहून उड्डाण केले. हे विमान दिल्ली येथे दुपारी २.४० वाजता पोहोचले. नियोजित वेळेपेक्षा सुमारे पाच तास उशीर झाल्याने अनेक प्रवाशांची कामे खोळंबली. काही प्रवाशांनी विमान कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम