अजित पवारांच्या आमदारांची संख्या गुलदस्त्यात !
दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ । राज्यातील राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठी फुट पाडीत अनेक आमदारांना सोबत घेत राजभवनात दाखल होवून सत्तेत सहभागी झाले. मात्र अजित पवार यांना या बंडात पाठिंबा असणाऱ्या पक्षाच्या आमदारांची संख्या अजूनही गुलदस्त्यात आहे. सकाळी ‘देवगिरी’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ३५ आमदार उपस्थित होते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ५४ आमदार आहेत. ९२ व्या घटनादुरस्तीनंतर पक्षातून वेगळे होत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी १/३ सदस्यसंख्या हवी. तरच फुटीर आमदार पक्षांतर बंदी कायद्यातून वाचतात. त्यासाठी अजित पवार यांना ३४ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, आपल्यासासेबत पक्ष आहे, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. त्याला पक्षाचे ३५ आमदार हजर होते. त्यामध्ये काही विधान परिषदेचे आमदारही होते. अजित पवार यांनी एप्रिल महिन्यात ४० आमदारांच्या सह्या घेतल्या होत्या. मात्र त्या वेळी बातम्या आल्याने प्रकरण थंड झाले होते. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अनेक आमदारांच्या सह्या त्यांना माहिती न देता घेतल्या गेल्या आहेत. शपथविधीनंतर अनेक आमदारांचे मला फोन आले. आमच्या सह्या घेतल्या आहेत, पण आपण शरद पवार यांच्यासोबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले, असा दावा पाटील यांनी केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम