राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जून २०२३ ।  राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात केलेले संघटनात्मक बदल आता हळूहळू दिसून येत असतांना दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब असल्यामुळे आता वेगवेगळ्या अटकळींना पेव फुटले आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे व आपले विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यावेळी त्यांनी सुप्रियांची पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुखपदीही नियुक्ती केली होती. त्यांचा हा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही पोस्टरवरून अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याचे दिसून आले. बैठकस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांसह केवळ सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल या दोघांचेच फोटो आहेत. या गोष्टीची बैठकस्थळी खमंग चर्चा रंगली होती. गत काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल झाले. पण त्यात अजित पवारांना कोणतेही स्थान मिळाले नाही. यामुळे शरद पवारांनी अजित पवारांकडे साफ दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर अजितदादांनी अलीकडेच एका कार्यक्रमात आपल्याला पक्ष संघटनेत एखादी जबाबदारी देण्याची मागणी केली. त्यावरही आता पक्ष नेतृत्वाने हुशारीची भूमिका घेतली आहे.

सुप्रिया सुळेंनी या प्रकरणी पक्षात सल्लामसलत करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. तर पवारांनी अवघ्या एका वाक्यात हा विषय संपवला होता. पक्षात कोणला कोणती जबाबदारी द्यावी याचा निर्णय मी एकटा घेत नाही. पक्षातील सर्व नेते मिळून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते.
2019 मध्ये अजित पवारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच हल्लकल्लोळ माजला होता. अजित पवारांनी त्यावेळी आपल्याकडे राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. पण त्यानंतर शरद पवारांनी सक्रिय भूमिका घेतल्यानंतर अजित पवारांनी आपली तलवार म्यान करत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे सरकार आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम