या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या; राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्ला
दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ । राज्यात कर्नाटक सीमा प्रश्नी वाद सुरु असतांना भाजप व ठाकरे गटातील शीत युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला.
संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असं म्हटलं जातंय. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असं संजय राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटामध्ये सध्या काय सुरुय, कुणाचं बिनसलंय याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही. सुरक्षेच्या बाबतीत बोलतांना राऊत म्हणाले, यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण काहीही फरक पडत नाहीत. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ती. असं म्हणून संजय राऊत यांनी जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्याबद्दलही विधान केलं. त्या पाण्यात सरकारने जलसमाधी घ्यावी, असं राऊत म्हणाले. कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम