आंबेडकरांनी दिला उद्धव ठाकरेंना हा सल्ला !
दै. बातमीदार । २५ मे २०२३ । राज्यातील भांडुपमध्ये नुकतीच वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्लादेखील दिला.
महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे. मात्र त्यांचा प्रयत्न आहे की यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सोबत यावे. त्यासंदर्भात मी म्हटलं की नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटाने निर्णय घेतला तर अधिक चांगले आहे, असा सल्लादेखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरदेखील निशाणा साधला. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतेमंडळींची होत असलेली चौकशी हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केला. राष्ट्रवादीत जयंत पाटलांप्रमाणेच अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की ‘आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा’, तर ते भाजपमध्ये जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरुंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय पक्ष कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांनादेखील टोला लगावला आहे. नाना पटोलेंची वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम