इर्शाळवाडी पाठोपाठ सप्तशृंगगडावर चिंतेचे वातावरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ ।  राज्यात झालेल्या पावसामुळे कोकणातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री भगवती मंदिराच्या पायऱ्या परिसरात भूस्खलन झालेल्या धोकादायक भागात त्वरित उपाययोजना करणे गरजे आहे.

याबाबत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने आजच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पाठवून कार्यवाही मागणी केली आहे. दरम्यान याबाबतच्या पाहणीत अतिवृष्टी झाल्यास भविष्यात लोकवस्तीजवळील डोंगराच्या पायथ्याचा भाग कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवित उपाययोजना कराव्यात असे वनविभागाने म्हटले आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे १,४८० मीटर उंचीवर सप्तश्रृंगीगड (वणी) हे देशातील पहाडी भागात असलेल्या शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचे आद्यस्वयंभू शक्तिपीठ आहे. वर्षभरात पन्नास ते साठ लाखांवर भाविक श्री भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरीवस्ती आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. दररोज पंधरा ते वीस हजार भाविकांची अस्थायी लोकसंख्या असते. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. यापूर्वीही अशा स्वरूपाची दुर्घटना घडलेली असल्याने शासनाने भविष्यातील भीषण दुर्घटना टाळण्यासाठी दरडींना अटकाव करण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळीचे कवच तसेच रॉक फॉल बॅरिअरचे काम केल्याने दरड कोसळण्याचा संभाव्य धोका काहीसा टळला असला तरी ही उपाययोजना पुरेशी होऊ शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम