“जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं; आमदाराची प्रतिक्रिया !
दै. बातमीदार । २३ मे २०२३ । राज्यातील शिंदे व फडणवीस यांचे सरकारमधील मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चा गेल्या महिन्यापासून जोर धरत होत्या. पण आजपर्यत कुठलीही घोषणा झालेली नसल्याने पुन्हा एकदा शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अपक्ष आमदाराने वक्तव्य केले आहे.
बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिय बोलकी आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं सांगितलं जातं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत हा विस्तार झाला नव्हता. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अशात बच्चू कडू जे बोलले त्याची चर्चा होते आहे. “जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामं करतोय. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे.” असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल, असं सर्वांना वाटत होतं. पण बच्चू कडू यांना अद्याप मंत्रीपद मिळालं नाही. मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत:ही अनेकदा उघड वक्तव्ये केली आहेत. आज मात्र त्यांनी मिश्किल वक्तव्य करत हसत हसत या सगळ्यावर भाष्य केलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम