शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीत अजून एक मोठा पक्ष येणार
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । राज्यात शिंदे आणि भाजप यांची युती झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रित दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने खलबतं सुरु आहेत. आज मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत चौथा पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची आणि आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामधील भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आला होता. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत प्राथमिक चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर होते तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर, त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर बैठकीला हजर असल्याची माहिती आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्या युतीवर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम