दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याची बॅट मैदानावर चांगलीच तडपत आहे. T-20 विश्वचषक 2022 मध्ये त्याने आणखी एक सन्मान पटकावला आहे. T-20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोहलीसोबतच झिम्बाब्वे संघाचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष गटात या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार कोहलीच्या खात्यात आला आहे. कोहलीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे.
कोहलीची विश्वचषकात शानदार कामगिरी
34 वर्षीय विराट कोहली जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. मात्र, त्याने तीन महिन्यांतच आपली लय साधली आहे. या T-20 विश्वचषकात कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत.यादरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने या विश्वचषकात पाकिस्तान (नाबाद 82), नेदरलँड्स (नाबाद 62) आणि बांगलादेश (नाबाद 64) विरुद्ध तिन्ही अर्धशतके झळकावली आहेत.
विराट कोहलीचा हा पहिला आयसीसी पुरस्कार नाही. याआधीही त्याने ICC क्रिकेटर ऑफ द इयर, क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI प्लेयर ऑफ द इयर, टेस्ट प्लेयर ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. यापैकी काही पुरस्कार कोहलीने अनेक वेळा जिंकले आहेत. एका वर्षात सर्व आयसीसी वार्षिक वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 2018 मधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी, ICC कसोटी आणि ODI प्लेअर ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम