मुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी !
दै. बातमीदार । ३ फेब्रुवारी २०२३ । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. तालिबानच्या नावाने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच ‘एनआयए’ला ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली असून, त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तालिबानचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांनी आदेश दिला. त्यानंतर हा मेल पाठवल्याचे धमकी देणाऱ्याने ई-मेलमध्ये म्हटले आहे. मात्र, या इशाऱ्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईतले मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धविनायक मंदिर, बाबूळनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजीअली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईवर हल्ले करू, अशा धमक्या सातत्याने येत आहेत. यापूर्वी ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचे 26 मेसेज पाठवले होते. त्याने 26/11 सारखा हल्ला करू असा इशारा दिला होता. पाकिस्तानमधील नंबरवरून ही धमकी आली होती.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी हल्ले करू अशा धमक्या दहशतवादी देतात. हे पाहता तपास यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून कडा पहारा सुरू केला आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला आलेल्या ई- मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम