आठवलेंनी दिली आंबेडकरांना थेट ऑफर !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । केद्रासह राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर आता नवीन डाव भाजपकडून टाकला जात असल्याचा काहींनी संशय व्यक्त केला आहे. यावेळी केद्रीय नेते रामदास आठवले यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उत आला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे. त्यांना भाजपकडे घेऊन जातो. उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही. त्यामुळे आपण भाजपसोबत राहू, अशी खुली ऑफर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते. शिर्डीमध्ये रिपाइंचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आता यावर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता आहे.
रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे कसे आहेत, ते मला माहित आहे. आता त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहू नये. ते आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले, तर त्यांचे स्वागतच असेल. प्रकाश आंबेडकर तर आमचे नेते, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्या बाजूने असते, सत्ता त्यांना मिळते. हे ध्यानात घेता प्रकाश आंबेडकरांनी माझ्योसोबत यावे. प्रकाश आंबेडकरांना मी भाजपकडे नेईन. आपण नरेंद्र मोदी आणि भाजपसोबत राहू. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांना काही मिळणार नाही. सारे भाजपकडे मिळेल, असे आवाहन त्यांनी केले. तर दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमूठ, रोज करतेय सगळ्यांची लूट, असे म्हणत टीका केली. रामदास आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. तुमच्या बेशिस्तपणामुळे पक्षाचा सत्यानाश झाला. नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी करून, घोषणाबाजी करून पक्ष वाढणार नाही. प्रसंगी अशा लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम