राज्यात बागेश्वर बाबांच्या दरबारात राजकीय नेत्यांची हजेरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । देशभर आपल्या चमत्काराच्या माध्यमातून प्रत्येकापर्यत पोहोचलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा राज्यात दौरा सध्या जोरदार चर्चेत आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मीरा रोड येथे बागेश्वर बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर आज बागेश्वर बाबा मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानाच्या दर्शनाला निघाले. मुंबईकरांचं आराध्य दैव असलेल्या मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन बागेश्वर बाबा यांनी घेतलं. यावेळी महाराष्ट्रातील बडे नेते बागेश्वर धाम यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी आमदार रविराणा, खासदार मनोज तिवारी, आमदार सदा सरवणकर, आमदार गीता जैन आदी नेते उपस्थित होते.

बागेश्वर बाबा यांचा महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा आहे. मुंबईनंतर ते लवकरच अमरावती येथे जाण्याची शक्यता आहे. अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून प्रभू श्री हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जात आहे. ही मूर्ती तब्बल १११ फुट उंचीची पूर्णाकृती मूर्ती असेल. धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते मूर्तीचा शिलान्यास केला जाईल, असे म्हटले जातेय. या करिता आज रवी राणा यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची हनुमान भक्ती अवघ्या महाराष्ट्रात परिचित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसावरून या दाम्पत्याने आव्हान दिलं होतं. राणा दाम्पत्याच्या आक्रमक आंदोलनानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राणा दाम्पत्याने हनुमान चालिसावरून अक्षरशः कोंडीत पकडलं होतं. तर दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री हेदेखील मोठे हनुमान भक्त असल्याचा दावा करतात. बजरंगबलीच्या कृपेमुळे आपण अनेक चमत्कार करू शकतो, असे ते त्यांच्या सत्संगांतून सांगत असतात. त्यामुळेच अमरावती येथील १११ फुटी पूर्णाकृती हनुमान मूर्तीच्या शिलान्यासासाठी राणा दाम्पत्याने बागेश्वर बाबांना आमंत्रित केल्याचं दिसून येतंय .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम