विध्यार्थ्यांनो सावधान : दहावी आणि बारावीच्या परीक्षा देताय या सूचनेचे करा पालन !
दै. बातमीदार । १५ फेब्रुवारी २०२३ । देशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. CBSE बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येईल. परीक्षेसाठी अवघे काही तास शिल्लक असून विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच परीक्षेआधी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे, यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही.
सकाळी 10 वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे परीक्षेला वेळेवर जा. वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचा. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करावा आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावं. तसेच विद्यार्थ्याकडे सीबीएसईचं प्रवेशपत्र असावं. केंद्राकडून परवानगी असलेलं स्टेशनरी साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत नेऊ नका. कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.
प्रवेशपत्रावर दिलेलं नियम नीट वाचा आणि त्यांचं पालन करणं सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असणार आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग निवडू नका आणि सर्व नियमांचं योग्यरित्या पालन करा. परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांचा भाग बनू नका. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत.
कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावीमध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई (CBSE) बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 38 लाख विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा आजपासून सुरू होत असून 15 एप्रिल 2023 पर्यंत घेण्यात येईल. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला एकूण 21.8 लाख विद्यार्थी आणि 16.9 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 7200 केंद्रांवर आणि जगभरातील 26 केंद्रांवर सीबीएसई परीक्षा घेण्यात येणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम