
भाजपला मोठा धक्का ; नेत्याने केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश !
दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ । गेल्या काही वर्षात भाजप नेहमीच कॉंग्रेसला धक्का देत देशात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तडकाफडकी राजीनाम्यानंतर जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेचे मतदान होणार आहे. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेल्या शेट्टर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी रविवारी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट यावेळी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी कापले. त्यामुळे नाराज नेते पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी तालुक्यातील केरुर या गावी १९५५ रोजी जन्मलेल्या शेट्टर यांनी २०१२ ते २०१३ पर्यंत कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सहा वेळा आमदार असलेले शेट्टर लिंगायत समाजातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१८ या काळात शेट्टर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. तसेच २००८-०९ या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम