
मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या मोर्चात चव्हाण मारणार दांडी !
दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । राज्यात आज महाविकास आघाडीचा मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण मात्र दांडी मारणार असल्याची स्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्ये केली जात आहेत. याच वक्तव्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबई महामोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाणांनी ट्वीट करत याविषयी खुलासा केला आहे. त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण मोर्चाला उपस्थित राहतील, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.”
अशोक चव्हाण नाराज असल्याचं या पूर्वीही अनेकदा त्यांच्या कृतीतून दिसलं होतं. अधिवेशनाला अनुपस्थिती, काँग्रेसच्या कार्यक्रमांना दांडी मारणं यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. तसंच शिवसेनेतल्या बंडाच्या काळात काँग्रेसही फुटणार अशी चर्चा सुरू होती, त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडणारे अशोक चव्हाणच अशी चर्चाही रंगत होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मोर्चाला अनुपस्थित राहत आपली नाराजी उघड केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम