
मोठी बातमी…! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; बारामतीजवळ विमान अपघातात सहा जण ठार
आज सकाळी बारामतीजवळील बारामती विमानतळाजवळ एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे डीजीसीएने अधिकृतरित्या सांगितले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची आज बारामती येथे सभा होणार होती. त्या सभांसाठी ते मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात घडून ते जवळच्या शेतात कोसळले.
Maharashtra Deputy CM Ajit Pawar, 3 others on board dead after aircraft crashes in Pune district: Official
— Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची मजबूत कामगिरी व्हावी यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते होते. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले, आणि त्यानंतर सलग बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आणि उपमुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
सध्या ते राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे..

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम