कर्जदारांसाठी मोठी बातमी : आरबीआयने घेतला निर्णय !
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । देशात गेल्या काही दिवसापासून महागाईचा डोंगर मोठा होत असतांना अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे तर अनेकांनी कर्ज देखील काढले आहे. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. कर्ज घेताना बँकेकडून अर्जदाराकडून अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. ही कागदपत्रे कर्जाची मुदत संपेपर्यंत बँका ठेवतात, परंतु कागदपत्रे बँकेकडे दीर्घकाळ राहिल्याने ती गहाळ झाल्याचे अनेकदा दिसून येते. ही अडचण लक्षात घेऊन आरबीआयने (RBI) कर्जदारांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या कर्जाशी संबंधित कागदपत्रे बँकेतून हरवल्यास, बँकेला त्या व्यक्तीला दंड द्यावा लागू शकतो, असे आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, बँकेतून आवश्यक कागदपत्रे गहाळ झाल्याने सरकारी कार्यालयांच्या फेऱ्यांमधूनही लोकांची सुटका होणार असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल 2023 मध्ये आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर बीपी कानुंगो यांनी आरबीआयला एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये असे नमूद केले होते की जर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीची कागदपत्रे हरवली, तर बँकेला दंड म्हणून संबंधीत व्यक्तीला पैसे द्यावे लागतील. या शिफारशींबाबत आरबीआयने सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत.
या अहवालात बँकांकडून ग्राहकांना आवश्यक कागदपत्रे परत करण्याच्या नियमांबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, कर्ज पूर्ण झाल्यानंतर, बँकांना ग्राहकांना कागदपत्रे परत करण्यासाठी एक तारीख निश्चित करावी लागेल. या तारखेपर्यंत बँकांना कागदपत्रे ग्राहकांना परत करावी लागतील. जर बँकेने देय तारखेपर्यंत कागदपत्रे परत केली नाहीत, तर बँकेला दंड स्वरूपात ग्राहकाला पैसे द्यावे लागतील. जेव्हा कोणतीही व्यक्ती गृहकर्ज , कार कर्ज आणि सुवर्ण कर्ज इत्यादी सुरक्षित कर्ज घेते, तेव्हा ग्राहकांना कागदपत्रे सादर करावी लागतात. कर्ज पूर्ण झाल्यानंतर एनओसीसह ही कागदपत्रे बँकांना परत करावी लागतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम