मोठी बातमी : महाविकास आघाडीत उमेदवारीहून कुरबुर सुरु !
दै. बातमीदार । १७ जानेवारी २०२३ । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे गट तसेच काँग्रेसने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीत आता मोठी कुरबुर सुरू असल्याचे चित्र आहे. यानंतरही उमेदवारीबाबत उद्या अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांनी मांडली.
उद्या बुधवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. सुधीर तांबे तीन वेळेस येथून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीकडून सुधीर तांबे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, एबी फॉर्म मिळूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे या जागेबाबत पेच निर्माण झाला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कदाचित त्यांच्या घरी काही चर्चा झाली असेल. त्यानंतर शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला असेल. मला याची जराशी कुणकुण लागली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी हे लक्षातही आणून दिले होते. काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. तसेच, काँग्रेसने एक डमी अर्ज भरुन ठेवावा, अशीही सूचना मी केली होती. अजित पवार म्हणाले, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे समजत आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. त्यामुळे उद्या काँग्रेसची भूमिका जाणून घेऊन तसेच ठाकरे गटाशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेऊ.
अजित पवार म्हणाले, जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाईल. शुंभागी पाटील यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांच्याकडे जिंकून येण्याची क्षमता आहे, असे सध्या तरी चित्र आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करायचा की नाही, हे उद्या निश्चित होईल. तसेच, सुधीर तांबे यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्यांची बाजू समजून घेता येईल.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत महाविकास आघाडीत समन्वय नसल्याच्या आरोपाचा अजित पवार यांनी इन्कार केला. अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीने व्यवस्थित बैठका घेऊन जागांचे वाटप केले होते. त्यात कुठेही संभ्रम नव्हता. उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज का भरला नाही?, हा काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. यामुळे भाजपला फायदा होईल, अशी शक्यता नाही. दरम्यान, दावोस येथील जागकित आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 1.4 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार असल्याचे म्हटले आहे. यावर अजित पवार म्हणाले, सामंजस्य करार होणे आणि प्रत्यक्ष करार होणे, यात फरक आहे. प्रत्यक्षात गुंतवणूक झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल. मात्र, राज्यात येऊ पाहणारी दीड लाख कोटींची गुंतवणूक सरकारने दुसऱ्या राज्याला दिली. यातून लाखो तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आले, हे सत्य नाकारु शकणार नाही. त्यानंतर हजार-हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे, अशी भलावण केली जात आहे. दीड लाख कोटींची गुतंवणूक राज्यातून का गेली?, याबाबत खरे तर सरकारने आत्मचिंतन करायला हवे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम